
वीरगाव(प्रतिनिधी)-
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक ट्रस्टच आहे. सर्वांच्या विचारविनिमयाने विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेऊन ही संस्था चालत असल्याने प्रायव्हेट ट्रस्टप्रमाणे कुठलेही संचालन संस्थेत होत नसल्याचा युक्तिवाद संस्थेचे अध्यक्ष जे.डी.आंबरेपाटील यांनी केला.
संस्थेच्या अनेक सभासदांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांचे नेतृत्वाखाली बैठक घेऊन संस्थेच्या विश्वस्तमंडळ आणि कार्यकारीणीवर अनेक गंभीर आरोप करुन आंदोलनाचा इशारा दिला होता. या आरोपांचे खंडन करण्यासाठी अकोले महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संस्थेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार नसून संस्थेचा कारभार उत्तमरीत्या चालू आहे. आपल्या 12 वर्ष 8 महिन्यातील अध्यक्षपदाच्या कार्यकाळात एम.बी.ए.,एम.सी.ए.,पॉलिटेक्निक कॉलेजची निर्मिती झाली.जिल्ह्यातील एकमेव भुगोल विषयाचे संशोधन केंद्र सुरु झाले. बंद पडलेल्या आय.टी.आय.चे पुनर्मुल्यांकन करुन अ वर्गाचे बनविले.परफेक्ट इंग्लिश मिडीयम ही इंग्रजी शाळा सन2016 पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यताप्राप्त आहे.

तालुक्यात विद्यापीठ व शासनाची मान्यता असलेले विना अनुदान तत्वावर शेंडी, कोतुळ, समशेरपूर या ठिकाणी महाविद्यालय असून अकोले महाविद्यालयास नँकने ए ग्रेड मानांकन दिलेली आहे. या कालावधीत एकूण 22 कोटी 4 लाख रुपयांची कामे करण्यात आली.हे सर्व विद्यार्थी हितासाठी आणि तालुक्यातील शैक्षणिक सुविधांच्या उपलब्धतेसाठी करण्यात आले. माजी मंत्री मधुकरराव पिचड,माजी आमदार वैभवराव पिचड,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर या कायम विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली निमंत्रित विश्वस्त आणि कार्यकारीणीचे कामकाज घटनेनुसार सुरु आहे.

मुलींच्या वसतिगृह इमारतीकरीता विद्यापीठ अनुदान आयोगाने 1 कोटी रुपये मंजुर केले होते. 30 लाख खात्यावर वर्गही झाले. परंतु ही रक्कम वेळेत खर्च न करुन अनियमितता झाल्यामुळे 19 लाख रुपये व्याजासहित 49 लाख रुपये विद्यापीठ अनुदान आयोगाला परत केले. उर्वरीत 50 लाख रुपयांचा दुसरा हप्ता महाविद्यालयाला मिळू शकला नाही. इमारत विस्तारीकरणासाठी मंजूर झालेले 8 लाखांचे अनुदानही विद्यापीठाकडून बांधकाम आराखडा मंजूर करुन न घेतल्यामुळे अनुदान मंजुर असून प्राप्त झाले नाही. एकंदरीत 1 कोटी 7 लाखांचा भुर्दंड संस्थेस बसला. त्यामुळे मुलींच्या वसतिगृहात भ्रष्टाचार झाला हा धादांत खोटा आरोप आहे.

महाविद्यालयाचे अनुदान आयोगाचे खात्यावरील व्यवहार केवळ प्राचार्यांच्या सहीने होतात. त्यामुळे अनुदानासंदर्भात भ्रष्टाचार अथवा गैरव्यवहार झाल्यास त्यास माजी प्राचार्य रमेशचंद्र खांडगे हेच जबाबदार असतील. खांडगे यांनी प्राचार्य परिषदेसाठी संस्थेच्या खात्यातून 1 लाख 25 हजारांचा घेतलेला अँडव्हान्सही आजपर्यंत परत केला नसल्याचा आरोपही अध्यक्ष जे.डी.आंबरे यांनी केला. या पत्रकारपरिषदेस संस्थेचे सचिव यशवंत आभाळे, प्राचार्य भास्कर शेळके, माजी प्राचार्य संजय ताकटे, कार्यकारीणी सदस्य सौ. कल्पना सुरपुरीया, धनंजय संत, सुधाकर देशमुख, एस. पी. देशमुख, आरीफ तांबोळी, विधिज्ञ भाऊसाहेब गोडसे आदी हजर होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी प्रमाणे आपल्या संस्थेची घटना आहे.अशी घटना राज्यभरात कोणत्याही संस्थेची नाही. स्व. दादासाहेब रुपवते यांनी या घटनेला मुर्त रुप दिल्याने घटनेनुसार संस्थेचा कारभार चालतो. संस्थेत एकाधिकारशाही आणि खाजगीकरणाचा आरोप साफ चुकीचा आहे. स्व. दादासाहेब रुपवते, स्व. लालचंदजी शहा, स्व.भाऊसाहेब हांडे, स्व. बुवासाहेब नवले, स्व. प्रेमानंद रुपवते यांची विचारधारा आणि घटनेनुसारच संस्थेचा कारभार चालतो.
– यशवंत आभाळे (सचिव,अ.ता.ए.संस्था)
