
संगमनेर (संजय आहिरे)
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्ष बांधणीचे काम जोरदारपणे हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेक मतदारसंघात संपर्क प्रमुख तसेच रिक्त पदांची भरतीही जोरदारपणे सुरू आहे. जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातही शिवसेनेने नवीन सैनिकांची नेमणूक करत जुन्या नव्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने नव्या जुन्यांच्या घातलेल्या या मेळ्यामुळे पालिका निवडणुकीत खेळ होईल का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


एकेकाळी संगमनेर शहरात शिवसेनेचा मोठा दबदबा होता. अप्पा केसेकर, जयवंत पवार, रावसाहेब गुंजाळ, भाऊ मेहेत्रे, संभाजीराजे थोरात, कैलास वाकचौरे यांच्या सारखे अनेक कडवट शिवसैनिक पक्षात सक्रिय होते. त्याचबरोबर तरुण शिवसैनिकांची मोठी फौज पक्षाच्या पाठीशी होती. निवडणुकीच्या राजकारणात फारशी यशस्वी नसली तरी शहराच्या राजकारणात मात्र मोठा दबदबा होता. परंतु काळाच्या ओघात व सत्तेच्या राजकारणात फाटाफूट व इतर अनेक कारणांमुळे शिवसेनेचा प्रभाव कमी झाला. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने शहरावर एकहाती सत्ता मिळवली आणि आजही काँग्रेस पक्षाचा दबदबा कायम आहे. आता जुने जाणते शिवसैनिक बाजुला जाऊन तरूणांच्या हाती शिवसेनेचे सुत्र आले आणि पक्षाला एकप्रकारे घरघर लागली. तडजोडी आणि काही तरी मिळविण्यासाठी पक्ष बाजुला ठेवला गेला. त्यामुळेच आज पालिकेत शिवसेनेचे प्रतिनिधी असूनही नसल्यासारखे आहे.

दरम्यान आज राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेचा उत्साह वाढला असून आगामी पालिका निवडणुक पुर्ण ताकतीने उतरण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला आहे. त्यासाठी पक्षानेही संघटनेत फेररचना करत पक्षात जोश भरण्याचा प्रयत्न केला आहे. पुर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक जयवंत पवार यांनी पुन्हा घरवापसी केली आणि पक्षानेही त्याची परतफेड म्हणून त्यांचे सुपुत्र प्रसाद पवार यांच्यावर दक्षिण शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. प्रसाद पवार हे शिवसेनेत सक्रिय नव्हते किंवा त्यांना मानणारा गटही शहरात नाही. परंतु वडीलांचे राजकीय वलय, समाजाची साथ, चुलते किशोर पवार यांचा राजकीय अनुभव व काम या जोरावर प्रसाद पवार यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे केवळ निवडणूक काळातच सक्रिय राहणारे अप्पा केसेकर यांच्यावर संगमनेर, अकोले विधानसभेची जबाबदारी देऊन त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. राजापूर येथील युवा सैनिक भाऊसाहेब हासे यांना उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे जुने जाणते शिवसैनिक पुन्हा सक्रिय झाले आणि उत्तर शहर प्रमुख अमर कतारी, अमोल कवडे, अमित चव्हाण, दिपक साळुंखे, पप्पू कानकाटे यांच्यासह युवा सैनिकांची चांगली साथ मिळाली तर शिवसेनेला पुन्हा चांगली उभारी मिळणार आहे.

राज्यातील महाआघाडी प्रमाणे येथेही महाआघाडी होईल व काँग्रेसच्या सहकार्याने आपल्याला पालिकेत सत्ताधारी बनता येईल यासाठी एक गट सक्रिय आहे. परंतु संगमनेरात महाआघाडी होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळेच शिवसेनेने स्वबळावरची चाचपणी व तयारी सुरु केली आहे. नुकतेच संपर्क प्रमुख व्होनाळे यांनी पदाधिकार्यांची बैठक घेत मते जाणून घेतली. या बैठकीला अनेक दिवसानंतर शिवसेनेचे अनेक जुने-नवे सैनिक उपस्थित होते. या जुन्या -नव्या शिवसैनिकांची मोठ बांधून अगामी पालिका निवडणूक स्वबळावर (राष्ट्रवादीची साथ) लढण्याचे मोठे आव्हान वरिष्ठ पदाधिकार्यांवर आहे. संगमनेरात आज प्रमुख विरोधीपक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जाते.त्यामुळे शिवसेनेला या निवडणूकीत मोठी मेहनत करावी लागणार आहे. जुन्या नव्यांचा मेळ बसला तरच या निवडणूकीचा खेळ रंगणार आहे.
