जिल्ह्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दररोज वाढतच आहे. बुधवारी काहिसा दिलासा मिळाल्यानंतर आज गुरुवारी कोरोनाने एकदम उसळी घेत आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले. आज तब्बल 148 रूग्ण आढळून आल्याने संगमनेरांमध्ये धाकधूक वाढली आहे. हि प्रचंड वाढ संगमनेरला पुन्हा एकदा लॉकडाउनच्या दिशेने ढकलत आहे.
आज गुरूवारी उच्चांकी रुग्णांची भर पडल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सोमवार पासून शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तालुक्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब बनली आहे.
तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकार्यांनी आढावा बैठका घेवून सक्तिच्या कारवाईचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाने सक्तीच्या कारवाईकडे कानाडोळा करत असल्याने व नागरिक बेजबाबदारपणाने गर्दी जमवित व नियम पायदळी तुडवीत असल्याने कोरोना तालुक्यात फैलावत आहे. संगमनेरात सध्या कोविडच्या नावाने ‘चांगभलं’ सुरु असल्याचे दिसते. बुधवारी 29 व आज गुरूवारी तब्बल 148 असे दोन दिवसांत 177 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याचा आकडा आठ हजारी पार पोहचला आहे.
फेब्रुवारीच्या मध्यानंतर जवळपास माघारी परतलेल्या कोविडचा जिल्ह्यात वेगाने प्रादुर्भाव सुरु झाला. त्यातही अहमदनगर पाठोपाठ, राहाता, संगमनेर, कोपरगाव, तालुक्यात गेल्या महिन्याभरात एकामागून एक रुग्णांना कोविडची लागण होवून या तालुक्यातील कोविड स्थिती पुन्हा पूर्ववत झाल्याचे दिसत आहे. या बिघडलेल्या परिस्थितितीमुळे या शहरांवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार लटकली आहे.
जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 1 हजार 338 इतके विक्रमी रुग्ण आढळून आले. यात अहमदनगर 457, संगमनेर 148, रहाता 140, कोपरगाव 101 तर शेजारी अकोले तालुक्यातही आज 74 रुग्ण आढळून आहे. जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्यातही मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहे.
वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने पुन्हा एकदा आरटीपीसीआर टेस्ट सह रॅपीड अँटीजन टेस्ट सुरु केली आहे. तसेच खाजगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी केल्या जात आहे. त्यामुळे जिल्ह्या झपट्याने नवे रुग्ण समोर येत आहे. संगमनेर तालुक्यात समोर आलेल्या 148 रुग्णांपैकी खाजगी लॅब मधून 31, आरटीपीसीआर 116, रॅपीड अँटीजन मधून 1 रुग्ण समोर आला आहे. दरम्यान संगमनेर ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने कोरोना चाचणी सुरु आहे. मात्र या चाचण्यांचे अहवाल चार ते पाच दिवसांनी मिळत असल्याने संभाव्य रुग्ण सायलंट कॅरिअर म्हणून फिरत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.