संगमनेर (प्रतिनिधी)
गेल्या वर्षभरापासून करोना महामारीचे संकट देशभरात थैमान घालत आहे. कोरोना कमी होईल ही अपेक्षा असतांना आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. संगमनेर तालुक्यात गुरूवारी पुन्हा 42 कोरोना बाधीत आढळून आले आहे. प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी वावरतांना नागरीकांना अनेक बंधने घालून देण्यात आली आहे. मात्र नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. संगमनेरसह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून 24 तासात तब्बल 323 रूग्ण आढळून आले आहे.
तालुक्यातील वाघापूर, सायखिंडी, सावरगाव तळ, घुलेवाडी, रायतेवाडी, वडगावपान, समनापूर, तळेगाव दिघे, घारगाव, पळसखेडे, शिबलापूर, गुंजाळवाडी, निमगावजाळी, पिंपळे, वडगावलांडगा, मंगळापूर, निमज, संगमनेर खुर्द, देवकौठे, कासारादुमाला येथे तर शहरातील मालदाड रोड, विद्यानगर. अभिनवनगर, अरगडे गल्ली, सत्संग नगर, देवीगल्ली, संजय गांधी नगर, जनतानगर, गणेशनगर, पंजाबी कॉलनी, सुयोग सोसायटी, घासबाजार, मेनरोड, इंदिरानगर, बाजार पेठ, नाशिक-पुणे रोड, अकोले नाका येथे करोना रुग्ण आढळून आले आहे. बुधवारपर्यंत तालुक्यात 263 तर गुरुवारी 42 करोना बाधीत रुग्ण आढळून आल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.
लग्न सोहळ्यांनी बिघडवलेली तालुक्याची कोविड स्थिती अद्यापही अनियंत्रितच असून गुरूवारी त्यात पुन्हा 42 इतक्या विक्रमी रुग्णांची भर पडली. तालुक्यातील संक्रमण वाढीला कारणीभूत ठरलेल्या लग्न सोहळ्यांमुळे ही परिस्थिती ओढावली आहे. असे प्रशासनाचे मत आहे. मात्र नागरिक त्यातून बोध घेण्यास तयार नसल्याचे भयानक चित्रही सध्या तालुक्यात दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सात ठिकाणी थेट छापे घालीत त्यातील तीन लग्न सोहळ्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र त्यातून संक्रमणात कोणतीही घट झाली नसल्याचे गुरूवारी प्राप्त झालेल्या अहवालातून समोर आले आहे. गुरूवारी तालुक्यातून एकूण 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 7 हजार 291 झाली असून सक्रीय रुग्णांची संख्या 285 वर पोहोचली आहे.
फेब्रुवारीच्या मध्यापासून तालुक्यातील संक्रमणात टप्प्याटप्प्याने वाढ झाली असून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत असल्याने तालुक्याची कोविड स्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली आहे. गर्दीतून प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने यापूर्वीच लग्न सोहळ्यांवर उपस्थितीचे बंधन घालतांना उर्वरीत सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. मात्र असे असतांनाही काही असंवेदनशील नागरिक अद्यापही त्यातून कोणताही बोध घ्यायला तयार नसल्याचे भयानक चित्रही दिसून येत आहे. अशा सोहळ्यांवर कारवाईसाठी प्रशासनाने आता कंबर कसली असून शहर पोलिसांनी सात ठिकाणी छापे घालीत सुरु असलेल्या सोहळ्यांची तपासणी केली. यावेळी घुलेवाडी येथील पाहुणचार मंगल कार्यालय, राजापूर परिसरातील विठाई मंगल कार्यालय व गुंजाळवाडी शिवारातील लक्ष्मीनगर परिसरात घराच्या समोर मांडव घालून मोठ्या उपस्थितीत लग्नकार्य सुरु असल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे वधू पक्षाच्या मंडळींवर प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे तीनही ठिकाणे मिळून पोलिसांनी 30 हजारांचा दंड वसूल केला व त्याठिकाणी जमलेल्या अतिरीक्त गर्दीला पांगवले. दररोज कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाही काही नागरिक अशा पद्धतीचे सोहळे आयोजित करुन एकप्रकारे अनेक नागरिकांचे जीवन संकटात घालत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होत असतांना काही बेजबाबदार नागरीकांच्या चुकांमुळे त्याचा प्रसार वाढत आहे. जर हा प्रसार थांबला नाही तर पुन्हा लॉकडाऊनचे संकट नागरीकांना झेलावे लागणार आहे.