
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सरकारने त्यांना आता Z सुरक्षा प्रदान केली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये मंत्रिपदी नियुक्त झालेले राणे यांना आतापर्यंत Y दर्जाची सुरक्षा होती. त्यातच वाढ करण्यात आल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF चे उप-महानिरीक्षक आणि प्रवक्ते डॉ. अनिल पांडे यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना देण्यात आलेल्या नवीन सुरक्षेच्या अंतर्गत CISF चे 6 ते 7 सशस्त्र जवान नेहमीच त्यांच्यासोबत असतील. यासोबतच, इतर पोलिस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचा 22 जण नारायण राणे यांच्या सुरक्षेत 24 तास तैनात राहतील. याबरोबरच त्यांच्यासोबत रुग्णवाहिकेसह 5 पेक्षा अधिक गाड्यांचा ताफा आणि एका बुलेटप्रूफ कारचा सुद्धा समावेश राहील.
देशात कुठल्याही कानाकोपऱ्यात हे जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहतील. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय तपास संस्थांना नारायण राणे यांच्या सुरक्षेला धोका असल्याची माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नारायण राणे यांनी विधान केले होते. त्यावरून त्यांना रत्नागिरी येथून ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी नारायण राणे यांना Y दर्जाचे संरक्षण प्राप्त होते. सीआयएसएफकडून इतर महत्वाच्या व्यक्तींना सुद्धा संरक्षण दिले जाते. त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा समावेश आहे.