गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही नवी नियमावली जारी करण्यात आली. नव्या नियमावलीनुसार लग्न सोहळ्यात फक्त 50 लोकांना परवानगी असेल. ही नवी नियमावली 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. सर्व सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्क्यांच्या क्षमतेनं खुली असतील, त्यासाठी राज्य सरकारने मुभा दिली. पण त्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक नियम पाळावे लागणार आहेत. मास्क नसल्यास ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच तापमान यंत्राने तपासणी केली असता तापमान प्रमाणापेक्षा जास्त आढळल्यास त्यालाही प्रवेश मिळणार नाही.
संगमनेर (प्रतिनिधी)
कोविड 19 च्या महामारीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य व देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. ही अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन हाटवून काही निर्बंध लावले. मात्र ओसरलेली कोरोनाची पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आणि सरकार सतर्क झाले. पुन्हा लॉकडाऊन नको म्हणून सरकाने काही निर्बंध लागू केले. मात्र काही बेजबाबदार नागरीक याबाबत केवळ सरकारला दोष देत असून त्यांना लॉकडाऊन पण नको आणि नियम पण नको आहेत. या बेजबाबदार नागरीकांमुळे मात्र इतरांचा जीव धोक्यात येत आहे. अशा बेजबाबदार नागरीकांवर कठोर कारवाई हाच एकमेव मार्ग आता प्रशासनासमोर आहे.
सरकारच्या अथक परिश्रमानंतर राज्यात कोरोनाला अटकाव करण्यात आला. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना ने पुन्हा एकदा उसळी मारली आहे. देशात महाराष्ट्र व व राज्यात नगर जिल्हा, व जिल्यात आपले संगमनेर आघाडीवर आहे. गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा तालुक्यात शंभर पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहे. हि संगमनेरसाठी धोक्याची घंटा आहे. सरकारने कोरोना रोखण्यासाठी काही जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन जाहीर केले. या लॉकडाउनला काही जनतेने विरोधही केला आहे. परंतु आता पुन्हा संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करणे उचित व परवडणारे नसल्याने सरकारने कडक निर्बंध लागू करत ते पाळण्याची सक्ती नागरिकांना केली आहे. तर यालाही काही नागरिक विरोध करत आहे. कोरोना रोखण्यासाठी सरकार व प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत असताना त्याला विरोध करणे सध्या तरी उचित नाही.
फेब्रुवारीपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल आहे. सरकारपुढे हि चिंतेची गोष्ट आहे. आधिच लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, अनेकांचे उद्योग धंदे ठप्प पडले आहेत. त्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू केल्याने पुन्हा एकदा अनेकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु कोरोना थांबविणे ही सरकारची प्राथमिकता असून त्यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. केवळ नगर जिल्ह्यात आत्ता पर्यंत सुमारे 77 हजार पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहे तर संगमनेर तालुक्यात 7 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत, आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात मागील आठ दिवसात तब्बल 400 नवीन रूग्ण आढळून आले. आज मंगळवारीही तालुक्यात पुन्हा 43 रूग्णांची भर पडली. या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा संगमनेरात ग्रामिण भागात व कॉटेज रूग्णालयात कोविड सेंटर कार्यन्वित करण्यात आले. तसेच क्वारंटाईन सेंटरही सुरू करण्याची वेळ प्रशासनावर येत आहे.
लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव व बाजारातील गर्दी कोरोना वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. ही गर्दी मर्यादीत राहावी व प्रत्येकाने मास्क वापरावा यासाठी थेट पोलिसांनी कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे. मात्र त्यातून नविन प्रश्न निर्माण झाले आहे. असे असले तरी नागरीकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोविड लस उपलब्ध झाली परंतु ती अजून सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी अजून बराच कालावधी लागणार आहे. तोपर्यंत मात्र आपण सर्वांनी नियम पाळून स्वतः सह इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण नियम पाळून व शासनाला सहकार्य करूनच कोरोनाला हरवू शकतो.
स्वतः ची प्रतिकार शक्ती चांगली आहे म्हणून इतरांच्या सुरक्षेला बाधा बनू नये. कोरोना रोखण्यासाठी नियम पाळणे गरजेचे असताना काही जणांना मात्र लॉकडाउन पण नको आणि नियम पण नको. अशा बेजबाबदार नागरीकांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.