संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेरात एटीएम फोडून त्यातील लाखों रुपयांची रोकड लंपास झालेली आहे. या चोर्यांचा तपास एकीकडे लागलेला नसताना आता पुन्हा एकदा चोरट्यांनी समनापूर येथे एटीएम फोडून पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. या चोरट्यांनी कहर करीत एटीएम फोडण्यासाठी चक्क डिटोनेटरचा वापर केला आहे. त्यामुळे सदरच्या घटनेने भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हार घोटी रस्त्यावर असणार्या समनापूर येथे ‘इंडिया वन’ कंपनीचे एटीएम आहे. अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम फोडून त्यातील सुमारे तीन लाखांची रक्कम लंपास केली आहे. हि घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी वापरलेल्या डिटोनेटरमुळे या एटीएम मशिनच्या अक्षरशः चिंध्या उडाल्या आहेत. शहरातील अनेक भागात यापुर्वी देखील एटीएम फोडीच्या घटना घडल्या आहेत. यात नाशिक रस्त्यावरील एटीएमसह मालदाड रोड व अकोले बायपास रस्त्यावरील बी.एड्.कॉलेज समोरील एटीएम फोडून या सर्वांमधून लाखों रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने घडलेल्या या घटनांमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅसकटरचा वापर केला होता. विशेष म्हणजे यातील बहुतेक घटनांमध्ये चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यातही कैद झाले, मात्र त्यातून पोलिसांना चोरट्यांचा माग काढण्यात आजवर यश मिळालेले नाही. या निमित्ताने सुरक्षा रक्षकांविना सुरू असलेल्या एटीएमची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे.
समनापूर येथील ‘इंडिया वन’ कंपनीचे एटीएम फोडल्याचे समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी केलेल्या पाहणीत सदरचे एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क डिटोनेटरचा वापर केल्याचे समोर आले. जीलेटीन व डिटोनेटरचा वापर विहिरी खणण्यासह दगडांच्या खाणीत केला जातो. चोरी करण्यासाठी अशा प्रकारच्या स्फोटकांचा वापर करण्याची तालुक्यात बहुधा ही पहिलीच वेळ आहे.