संगमनेर (प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे महामार्गावर व आडमार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत असल्याने सतर्क झालेल्या शहर पोलिसांनी सापळा रचून या चोर लुटारुंची टोळी जेरबंद केली. सहा पैकी तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून तीन जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ही कारवाई समनापूर बायपास पुणे रोडवर शनिवारी रात्री एक च्या सुमारास करण्यात आली. यावेळी या दरोडेखोरांकडुन कोयता, गिलोर व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. या सर्व दरोडेखोरांवर यापुर्वी विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कोविड संकटामुळे अर्थव्यवस्था बिघडल्याने अनेक जणांवर आर्थिक संकटे ओढावली आहे. अनेक जणांचे रोजगार हिरावला आहे. मात्र सर्वसामान्य माणूस संघर्ष करीत आहेत. तर दुसरीकडे काही तरुण झटपट श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगारीकडे वळले आहेत. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे महामार्गावर, घाटात तसेच आडमार्गावर प्रवाशांना, वाहनचालकांना लुटण्याच्या घटना घडत आहे. नाशिक पुणे महामार्गावरील अनेक पुलाखाली व इतर सुनसान रस्त्यावर अंधाराचा फायदा घेत हे चोरटे दबा धरून बसतात. येणार्या दुचाकीस्वार किंवा प्रवासी वाहन अडवून त्यांना घातक शस्राचा धाक दाखवून भीती दाखवली जाते. त्यानंतर त्यांच्याकडून किमती सामान, मोबाईल, रोख रक्कम जबरदस्तीने घेतली जाते. न दिल्यास प्रसंगी मारहाण केली जाते. आतापर्यंत अनेक लोकांना या चोरट्यांनी मारहाण करून लुटले आहे. काही दिवसांपूर्वीच एका शिक्षकालाही चोरट्यांनी लुटले होते. भीती पोटी व कमी रकमेची लुट म्हणून कोणी फारशी पोलीसांत तक्रार करत नाही. म्हणून या चोरट्यांचे फावत होते.
दरम्यान समनापूर शिवारात पुणे बायपास रस्त्यावर अज्ञात चोरटे प्रवाशांना लुटत असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. देशमुख यांनी पोलीस पथकासह या ठिकाणी धाव घेतली. यावेळी पोलिसांना काही चोरटे आढळून आले. पोलिसांना पाहून चोरट्यांनी पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले तर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी विक्रम रामनाथ घोडेकर (वय 20, पंपींग स्टेशन, कासारवाडी रोड) अजित अरूण ठोसर (वय 20, पंपींग स्टेशन, कासारवाडी रोड) सर्फराज राजू शेख (वय 19, रा. लालतारा कॉलनी, अकोले नाका) या तीघांना अटक केली असून त्यांचे साथीदार कलिम अकबर पठाण, हलिम अकबर पठाण, असिफ शेख (सर्व रा. जमजम कॉलनी) हे फरार झाले आहेत. त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चोरट्यांचा तपास महिला पोलिस उपनिरिक्षक निकीता महाले करत आहेत.
दरम्यान या चोरटयांपैकी विक्रम घोडेकर याच्यावर विविध कलमाखाली 2, अजित ठोसर याच्यावर 1, कलिम पठाण याच्यावर 6, हलिम पठाण याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत.